
उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली ः आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला सहा विकेट्सने हरवले. भारताकडून पराभव होऊन २४ तासांपेक्षा कमी वेळ झाला होता आणि आता पुन्हा एकदा भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाला आहे. पण यावेळी मैदान वेगळे होते. भारताने सॅफ अंडर १७ चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा ३-२ असा पराभव केला. क्रिकेट नंतर आता फुटबॉलच्या मैदानावरही भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाला आहे.
कोलंबो रेसकोर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ग्रुप बी सामन्यात, भारतीय संघाने पाकिस्तानचा ३-२ असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. या सामन्यात भारताचे तीन खेळाडू गोल करण्यात यशस्वी झाले – डल्लुलामुआन गंगटे, गुनलेबा वांगकेइराकपम आणि रहान अहमद. या तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय आणि वेगवान आक्रमणांसह संपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या बचावावर दबाव कायम ठेवला. रहान अहमदचा विजयी गोल सामन्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला.
या विजयासह भारताने ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान मिळवले आणि सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना नेपाळशी होईल, तर पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होईल. दोन्ही सेमीफायनल २५ सप्टेंबर रोजी खेळले जातील. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे मनोरंजक असेल.