
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस मुख्यालय व नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ५५ व १०४, रबाळे येथे झालेल्या शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीने १३ सुवर्ण, ८ रौप्य व ७ कांस्य पदकं मिळवत एकूण २८ पदकांची कमाई करत उल्लेखनीय यश संपादित केले. सर्व सुवर्णपदक विजेते खेळाडू मुंबई विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
सुवर्णपदक विजेत्यांमध्ये तेरणा विद्यालयाचे खेळाडू श्रवण भोसले, ओमकार भोसले, राज जाधव, आशिष राडीये, श्रावणी पाटणे, वैदही वाघमारे, चैताली नागणे व अरमान अन्सारी त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ९३ ची आर्या माने, पोद्दार इंटरनॅशनल शाळेची प्रणूशा रावत, पुणे विद्याभवन शाळेचा आदर्श चव्हाण, एस आय इ एस महाविद्यालयाचा ओमकार चव्हाण व शांतिनिकेतन शाळेचा क्षितिज रांधे यांनी सुवर्णपदक पटकावून विभागीय स्तरावर आपली निवड निश्चित केली आहे.
हे सर्व खेळाडू शालेय अभ्यासाबरोबर तायक्वांदोचा सराव करून उत्कृष्ट यश मिळवत आहेत. त्यांच्या या कामगिरीत मुख्य प्रशिक्षक रोहित तानाजी सिनलकर तसेच सहाय्यक प्रशिक्षक प्रेम विलास पाटणे यांचे मार्गदर्शन आणि सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. खेळाडूंच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सर्व पदक विजेत्या स्पर्धकांचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तुषार सिनलकर, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले व विभागीय शालेय स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या.