
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः अदनान अहमद सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इलेव्हन संघाने महाराणा ११ संघाचा २५ धावांनी पराभव केला. अदनान अहमद हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. टीएम इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद १९० अशी भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात महाराणा ११ संघ १९.५ षटकात नऊ बाद १६५ धावा काढू शकला. टीम एक्सएल संघाने २५ धावांनी विजय नोंदवला.
या सामन्यात अदनान अहमद याने अवघ्या ४८ चेंडूत ८३ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. त्याने सहा उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. सय्यद नदीम याने २५ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. त्याने सात चौकार व एक षटकार मारला. अलीम शाह याने पाच चौकार व एक षटकार ठोकत ३८ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत सुनील जी याने भेदक गोलंदाजी केली. त्याने २९ धावांत चार विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. रवी बदाडे याने १२ धावांत दोन गडी बाद केले तर मानसिंग घुनावत याने २८ धावांत दोन बळी टिपले. दुसरा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही असे संयोजक निलेश गवई यांनी सांगितले