नांदेड : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व निवडणूक २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीत असोसिएशनला संलग्न असलेल्या २२ राज्य संघटनांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, काही संघटनांना विविध निकषांच्या आधारे मतदानातून वगळण्यात आले असून या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या यादीतील क्रमांक सहावर असलेल्या महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशन या संघटनेला राष्ट्रीय फेडरेशनची मान्यता नसतानाही पात्र मतदान यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. या निर्णयावर प्रा. जयपाल रेड्डी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया यांनी १६ मे २०२२ रोजी दिलेल्या पत्राद्वारे, सदर संघटनेच्या २०२२ ते २०२६ या कार्यकारिणीला मान्यता देता येणार नाही. तसेच वैयक्तिक सदस्याला मतदानाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय उपायुक्त धर्मादाय, मुंबई यांच्याकडे सदर प्रकरण प्रलंबित आहेत. रेड्डी यांनी सांगितले की, वादग्रस्त व बोगस संघटनेला ऑलिम्पिक असोसिएशनकडून पाठबळ दिले जात आहे. आम्ही २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे अधिकृत आक्षेप नोंदवले आहेत. तरीही जर या संघटनेला मतदानाचा अधिकार देण्यात आला, तर २५ सप्टेंबरपासून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे.