
नाशिक येथे मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद
नाशिक ः नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने रामभूमी बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने नाशिक शहरात नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात १५ हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत संपूर्ण जिल्हाभरातील हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यात २१ वर्षांखालील, ३० वर्षांखालील व ३० वर्षांवरील जिल्हास्तरीय गट अशा ३ गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेच्या दरम्यान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. तसेच आमदार राहुल ढिकले, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानी ताई फरांदे, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री योगेश मैंद, नाशिक शहराध्यक्ष प्रवीण भाटे यांच्या समावेत नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त श्रीमती अय्यर, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, कविता राऊत, मोनिका अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. गिरीश महाजन यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, अस्मिता दर्शन महिला मंडळ, रामभूमी बहुउद्देशीय संस्था याचे सर्व पदाधिकारी व दीपक निकम, अनंत चकोर, कुणाल अहिरे, अविनाश वाघ, शैलेश रकिबे, अंकुश सिंग, संदीप फोगाट, हेमंत पाटील आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
२१ वयोगट मुले ः १. गोविंद पांडे, २. ऋषिकेश वावरे, ३. ईश्वर झिरवाळ. मुलींचा गट ः १. अर्चना शिवराम, २. अंजली पंडित, ३. शुभांगी गायकर.
३० वयोगट युवक ः १. रोहित चौधरी, २. योगेश पाडवी, ३. शुभांगी गायकर. युवती गट ः १. रवीना गायकवाड, २. दिशा बोरसे, ३. साक्षी कसबे.