
सहा गटांत पटकावले विजेतेपद
छत्रपती संभाजीनगर ः आंतरशालेय रग्बी स्पर्धेत रायपूर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल संघाने १४, १७ व १९ या तिन्ही वयोगटात विजेतेपद पटकावत जेतेपदाचा षटकार ठोकला आहे. एकूण सहा गटात विजेतेपद पटकावत या शाळेच्या संघाने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर जिल्हा रग्बी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय रग्बी स्पर्धेचे आयोजन रायपूर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. विभागस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई व क्रीडा अधिकारी डॉ रेखा परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली रग्बी राज्य संघटनेचे इसराज कोटारकी, पायल कनोजिया, प्रशांत सिंग, निलेश माळी, वैशाली चव्हाण, मनोज चव्हाण, राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्कूलचे कमांडर संजय सोनवणे, प्राचार्य निखिल राठोड, क्रीडा प्रमुख जयभारत दुधमोगरे, दत्ता पडघान, सुनील सोळूंके, साहेबराव नेटके व बाजीराव भुतेकर यांनी जबाबदारी पार पाडली. विजयी संघांना आगामी होणाऱ्या विभागीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी सांगितले.
अंतिम निकाल
१४ वयोगट मुले ः १. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, २. लिटिल वंडर्स स्कूल, सिल्लोड. मुलींचा गट ः १. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, २. शांतीनिकेतन विद्यालय, फुलंब्री.
१७ वयोगट मुले ः १. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, २. ज्ञानदीप इंग्लिश हायस्कूल, दौलताबाद. मुलींचा गट ः १. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, २. छत्रपती शिवाजी प्रिपेटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गंगापूर.
१९ वयोगट मुले ः १. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, २. छत्रपती शिवाजी प्रिपेटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गंगापूर. मुलींचा गट ः १. राष्ट्रमाता इंदिरा गांदी सैनिकी स्कूल.