भारतीय युवा संघाने वन-डे मालिका जिंकली

  • By admin
  • September 24, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love
  • दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५१ धावांनी पराभव
  • वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी लक्षवेधक 

नवी दिल्ली ः भारतीय १९ वर्षांखालील संघाने दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाचा ५१ धावांनी पराभव केला. वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी लक्षवेधक ठरली. 

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३०० धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाकडून जेडेन ड्रेपर याने दमदार शतक झळकावले, परंतु उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने एकूण २४९ धावांचा टप्पा गाठला. भारताकडून तीन खेळाडूंनी अर्धशतके झळकावली.

वैभव सूर्यवंशीची दमदार फलंदाजी
दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली, कर्णधार आयुष म्हात्रे शून्यावर बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्राने जोरदार फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ७० धावा केल्या, उत्कृष्ट अर्धशतके झळकावली. अभिज्ञान कुंडूने ६४ चेंडूत ७१ धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. वेदांत त्रिवेदीने २६ धावांची खेळी केली. या खेळाडूंमुळेच भारतीय अंडर-१९ संघ ३०० धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून विल बायरमने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

जेडेन ड्रेपरने शतक झळकावले
ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाकडून कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. सलामीवीर अ‍ॅलेक्स टर्नरने २४ धावा केल्या. नंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या जेडेन ड्रेपरने ७२ चेंडूत १०७ धावा केल्या, ज्यात आठ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. शेवटी आर्यन शर्माने ४४ चेंडूत ३८ धावा केल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. तथापि, इतर फलंदाजांकडून त्यांना साथ न मिळाल्याने हे खेळाडू संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. यामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ ५० षटकेही पूर्ण करू शकला नाही आणि ४७.२ षटकांत २४९ धावांवर बाद झाला.

आयुष म्हात्रेने तीन विकेट घेतल्या
भारतीय अंडर-१९ संघाकडून कर्णधार आयुष म्हात्रे आणि कनिष्क चौहान यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. आयुषने चार षटकांत २७ धावा देत तीन विकेट्स घेतल्या, जे किफायतशीर ठरले. कनिष्क याने दोन विकेट्स घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *