
मुंबई ः मुंबई उपनगरने मुंबई विद्यापीठ पुरुष/महिला आंतर विभागीय महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत दुहेरी यश प्राप्त केले. या दोन्ही विजयात प्रशिक्षक आंतर राष्ट्रीय खेळाडू, प्रो-कबड्डी स्टार निलेश शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे.
रामानंद आर्य डी. ए. व्ही. महाविद्यालय, भांडुप (पूर्व ) यांनी मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल, मरीन लाईन (प.), मुंबई येथे आयोजित केलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई उपनगरने दुबळ्या मुंबई शहरचा २९-२३ असा पराभव करीत पुरुष विभागात प्रथम स्थान पटकाविले. आक्रमक सुरुवात करीत पहिल्याच सत्रात लोण देत उपनगरने २०-१४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर साखळीत दोन्ही सामने पराभूत झालेल्या मुंबईने नांगी टाकली. राज आचार्य, ऋतिक ठोंबरे, दिनेश यांच्या चढाई पकडीच्या जोशपूर्ण खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

महिलांच्या चुरशीच्या सामन्यात मुंबई उपनगरने पहिल्या डावातील १४-१५ अशा पीछाडीवरून मुंबई शहरला ३३-२८ असे नमवीत या विभागात अग्रस्थान पटकविले. मोक्षा पुजारी, स्नेहल चिंदरकर, समृद्धी मोहिते यांच्या सर्वांगासुंदर खेळाला याचे श्रेय जाते. रिया मडकईकर, समृद्धी भगत, ममता चव्हाण यांचा खेळ दुसऱ्या डावात कमी पडला. महिला विभागात तिसरे स्थान मिळविताना कोकण विभागाने ठाणे विभागाला नमविले. या पराभवाने मुंबई संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चैताली म्हात्रे, चिन्मयी डांगळे, पूजा बेंद्रे, प्राची भादवणकर यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त खेळणे ही किमया केली. सानिया गायकवाड, प्रतीक्षा मार्कड यांचा खेळ ठाण्याचा पराभव टाळण्यात कमी पडला.
पुरुष गटात दुसरे स्थान मिळविताना कोकण विभागाने ठाणे विभागाला नमविले. ठाण्याला तिसरे स्थान प्राप्त झाले. सावध सुरुवात करीत पहिला लोण देत कोकण विभागाने विश्रांतील २३-१८ अशी आघाडी घेतली. नीरज मिसाळ, ऋतिक पाटील यांच्या झंजावाती चढाया त्यांना अमरीश कश्यप, निलेश शिंदे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. पुरुषांत मुंबई शहर, तर महिलांत ठाणे विभाग चौथ्या स्थानी राहिले.