
मुंबई ः अतिशय चुरशीच्या सामन्यात जितेंद्र जाधवने स्वरूप आंब्रेचे आव्हान १०-६ असे संपुष्टात आणले आणि सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे, आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली दक्षिण मुंबई विभागीय निवड चाचणी विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात सार्थक घाडीगावकर, वेदांत मोरे, अर्णव पवार यांनी विजयीदौड कायम राखली.
दैवत रंगमंच-भायखळा येथील विभागीय निवड चाचणी स्पर्धेची सार्थक घाडीगावकर विरुध्द तन्मय चव्हाण यामधील दुसरी उपांत्यपूर्व फेरीची लढत अटीतटीची रंगली. प्रारंभी छान खेळणाऱ्या तन्मयला सार्थक घाडीगावकरने अचूकतेचे सातत्य राखून १४-८ असा विजय संपादन केला. अन्य सामन्यात अर्णव पवारने सर्वेश परुळेकरचा १२-३ असा तर वेदांत मोरेने दुर्वांक शेलारचा १४-० असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. मुंबईत २४ ऑक्टोबरपासून होणाऱ्या कोकण कप विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस आहे.