पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत १८८ खेळाडूंचा सहभाग

  • By admin
  • September 25, 2025
  • 0
  • 144 Views
Spread the love

पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग (१७ वर्षे मुले व मुली) स्पर्धेचे जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पिंपरी-चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे सचिव मनोज यादव, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे व जीवनलाल निंदाने, तसेच स्पर्धेचे वैद्यकीय अधिकारी डॉ ओंकार कौले आदी मान्यवर उपस्थित होते.

या विभागीय स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर शहर, सोलापूर जिल्हा व सोलापूर शहर या ७ संघांच्या १८८ खेळाडूंनी (९० मुले व ९८ मुली) सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेते खेळाडू अलिबाग, रायगड येथे २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणार आहेत, असे पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी केले. पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी आभार मानले. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रीय पंच ऋषिकांत वचकल यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *