
दुबई ः भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयसीसीच्या अधिकृत सुनावणीदरम्यान कोणतेही राजकीय विधान करण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला आयसीसी मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तथापि, सूर्यकुमारविरुद्ध काय कारवाई करण्यात आली आहे हे अद्याप कळलेले नाही. १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर सात दिवसांच्या आत पीसीबीने तक्रार दाखल केल्याचे समजते.
टी २० आशिया कपच्या गट टप्प्यात भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. सामन्यानंतर, सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना विजय समर्पित केला.
सूर्यकुमार यादव सुनावणीला उपस्थित
स्पर्धेच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की सूर्यकुमार यादव आयसीसीच्या सुनावणीला उपस्थित राहिला. त्याच्यासोबत बीसीसीआयचे सीओओ आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर होते. रिचर्डसन यांनी त्यांना समजावून सांगितले की त्यांनी राजकीय अर्थ लावता येईल अशी कोणतीही टिप्पणी करू नये. दंडाचे स्वरूप अद्याप कळलेले नाही. हा दंड लेव्हल १ अंतर्गत येत असल्याने, तो एकतर इशारा असू शकतो किंवा सामना शुल्कात १५ टक्के कपात करण्याचा आर्थिक दंड असू शकतो.
बीसीसीआयची दोन पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध तक्रार
बीसीसीआय शुक्रवारी पाकिस्तानचे साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करेल, कारण हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्ध आशिया कप सामना खेळत आहेत. साहिबजादा आणि रौफ यांनी लेखी स्वरूपात आरोप फेटाळून लावल्याने आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करेल. सुनावणीसाठी त्यांना आयसीसी एलिट पॅनेलचे रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर हजर राहावे लागू शकते.