
मुंबई ः सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे, आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली दक्षिण मुंबई विभागीय निवड चाचणी विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत सेंट मेरी हायस्कूल-भायखाळ्याचा वेदांत मोरे विजेता ठरला.
राणीवर वर्चस्व राखूनही पहिले दोन बोर्ड हातचे निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या जितेंद्र जाधवचा वेदांत मोरेने १७-४ असा पराभव केला. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण, मंडळाचे पदाधिकारी भूषण परुळेकर, चंद्रकांत करंगुटकर, अनिल शेलार, प्रदीप मसुरकर आदींच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.
दैवत रंगमंच-भायखळा येथील विभागीय निवड चाचणी स्पर्धेच्या लढती ३२ खेळाडूंच्या सहभागाने रंगल्या. उपांत्य फेरीत वेदांत मोरेने सार्थक घाडीगावकरला तर जितेंद्र जाधवने अर्णव पवारला हरवून अंतिम फेरीत धडक दिली.
या स्पर्धेमध्ये उपांत्य उपविजेते आर एम भट हायस्कूलचा सार्थक घाडीगावकर व सेंट जोसेफ हायस्कूल-डोंगरीचा अर्णव पवार तर उपांत्यपूर्व उपविजेते डॉ शिरोडकर हायस्कूल-परेलचा स्वरूप आंब्रे व तन्मय चव्हाण, भरडा न्यू हायस्कूल-फोर्टचा दुर्वांक शेलार, सेंट जोसेफ हायस्कूल-डोंगरीचा सर्वेश परुळेकर यांनी पुरस्कार जिंकले. विजेत्यांना मुंबईत २५ ऑक्टोबरपासून होणाऱ्या कोकण कप विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात थेट प्रवेश दिला जाणार आहे.