
नंदुरबार शालेय टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात संपन्न
नंदुरबार ः मैदानी खेळातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शालेय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच मोबाईल, कॉम्प्युटरवर गेम खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा असे प्रतिपादन टेनिक्वाईट संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी केले.
ते येथील जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे घेण्यात आली. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेता डी आर हायस्कूल संघाने उपविजेतेपद पटकावले. के डी गावित सैनिकी विद्यालय संघाने मुलींच्या गटात विजेतेतेपद संपादन केले. तसेच कमला नेहरू कन्या विद्यालय संघर उपविजेता ठरला. डॉ काणे गर्ल्स हायस्कूल संघ १७ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेता ठरला.
डी आर हायस्कूल संघाने उपविजेतेपद मिळवले. श्रॉफ हायस्कूल संघ मुलींच्या गटात विजेता ठरला तर कमला नेहरू कन्या विद्यालय संघ उपविजेता ठरला. तसेच एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल संघाने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद तर डी आर हायस्कूल संघाने उपविजेता संपादन केले. यशवंत ज्युनियर कॉलेज नंदुरबार संघ मुलींच्या गटात विजेता तर कमला नेहरू कन्या विद्यालय संघ उपविजेता ठरला. यशवंत ज्युनिअर कॉलेज नंदुरबार संघाने विजेतेपद पटकाविले.
विजयी खेळाडूंना जिल्हा टेनिक्वाईट संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, जिल्हा टेनिक्वाईट संघटनेचे उपाध्यक्ष श्रीराम मोडक, तलवारबाजी संघटनेचे सचिव भागुराव जाधव, ज्येष्ठ शिक्षक सबस्टिन जयकर, क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, जिल्हा सचिव डॉ मयूर ठाकरे, क्रीडा शिक्षक प्रा. दिनेश सूर्यवंशी, योगेश माळी, भटू पाटील, जितेंद्र पगारे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष राजेश्वर चौधरी आदी उपस्थित होते. स्पर्धेला पंच म्हणून राकेश चौधरी, गणेश गोसावी, जयेश जेठे आदींनी परिश्रम घेतले.