
मलकापूर ः राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेकरिता पलक परदेशी व आरोही दरेगावे या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम व महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटना अंतर्गत विभागीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे करण्यात आले होते. त्यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला शहर, अकोला ग्रामीण, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण या संघांचा सहभाग होता.
१७ वर्षांखालील वयोगटात स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूरची पलक शैलेंद्रसिंह परदेशी हिने सुरुवातीचे दोन सामने जिंकून अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश निश्चित केला. अंतिम सामन्यांमध्ये पलक उपविजेती ठरली. तसेच १४ वर्षांखालील वयोगटात स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेची आरोही देविदास दरेगावे हिने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यांमध्ये आपले स्थान निश्चित केले. आरोही अंतिम सामन्यांमध्ये उपविजेती राहिली. पलक व आरोही यांनी उत्कृष्ट खेळ खेळून राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले.
राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा पुढील महिन्यात पुणे या ठिकाणी होणार आहे. या दोन्ही खेळाडूंना स्कूल ऑफ स्कॉलर्सचे क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल साळुंके, क्रीडा शिक्षक मनीष उमाळे, विनायक सुरळकर, क्रीडा शिक्षिका मानसी पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. पलक व आरोहीच्या कामगिरीबद्दल स्कूल ऑफ स्कॉलर्सचे अध्यक्ष उल्हासकुमार संचेती, संचालक विमलकुमार संचेती, ॲड अमर कुमार संचेती, मुख्याध्यापिका डॉ सुदीप्ता सरकार, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, मलकापूर तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, क्रीडा अधिकारी आर आर धारपवार, क्रीडा संकुल केअर टेकर चंद्रकांत साळुंके, बुलढाणा जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष संतोष बोरगावकर, कार्यकारी अध्यक्ष राजेश महाजन, सचिव विजय पळसकर, खजिनदार राजेश्वर खंगार व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांनी कौतुक व अभिनंदन केले.