
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः निकित चौधरी, ऋषिकेश तरडे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राऊडी सुपर किंग संघाने रायझिंग स्टार संघाचा ९३ धावांनी मोठा पराभव केला. दुसऱया सामन्यात यंग ११ संघाने व्हिजन क्रिकेट अकादमीवर ६६ धावांनी सहज विजय नोंदवला. या लढतींमध्ये निकित चौधरी व ऋषिकेश तरडे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. रायझिंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राऊडी सुपर किंग संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात सर्वबाद १७९ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रायझिंग स्टार संघ १७ षटकात ८६ धावांत सर्वबाद झाला. राऊडी सुपर किंगने हा सामना ९३ धावांनी जिंकला.
या लढतीत निकित चौधरी याने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने ४२ चेंडूत ७३ धावा काढल्या. त्याने नऊ चौकार व दोन षटकार मारले. ऋषभ लहाने याने १९ चेंडूत २८ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. जी सचिन याने दोन षटकारांसह २१ धावा फटकावल्या.
गोलंदाजीत अमोल जाधव याने ३५ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. राजू परचाके याने ७ धावांत तीन गडी बाद केले. आकाश सोळुंके याने ३८ धावांत तीन बळी घेतले.
व्हिजन अकादमी पराभूत
दुसऱया सामन्यात यंग ११ संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघावर ६६ धावांनी विजय नोंदवत आगेकूच केली. यंग ११ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात पाच बाद २०६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना व्हिजन क्रिकेट अकादमी संघ २० षटकात नऊ बाद १४० धावा काढू शकला. त्यांना ६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या लढतीत ऋषिकेश तरडे याने २६ चेंडूत ६५ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने पाच टोलेजंग षटकार व चार चौकार ठोकले. मधुर पटेल याने तीन उत्तुंग षटकार, दोन चौकारांसह ५० धावांची वेगवान खेळी केली अभिजित भगत यने सहा चौकारांसह ३८ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत संतोष सोळुंके (४-२५), सय्यद अब्दुल वाहीद (२-२१) व गिरीश खत्री (२-३३) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या.