भारतीय संघाचा रोमहर्षक विजय

  • By admin
  • September 27, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

रोमांचक टायनंतर श्रीलंका संघ पराभूत, पथुम निस्सांकाचे शतक व्यर्थ

दुबई ः आशिया कप स्पर्धेतील सुपर फोर मधील भारत आणि श्रीलंकेतील अखेरचा सामना रोमहर्षक टाय झाला. अर्शदीप सिंगने श्रीलंकेचे २ धावांत २ विकेट टिपून संघाचा विजयाचा मार्ग प्रशस्त केला. भारताने पहिल्याच चेंडूवर तीन धावा काढून शानदार विजय साकारला. पथुम निस्सांकाच्या (१०७) स्फोटक शतकानंतरही श्रीलंका संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह भारताने सलग सहा सामने जिंकले आहेत. 

सामना टाय झाल्यानंतर भारताला विजयासाठी ३ धावांची गरज होती. सूर्यकुमार यादव व शुभमन गिल मैदानावर उतरले. सूर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर तीन धावा फटकावत संघाला सामना जिंकून  दिला. 

यंदाच्या आशिया कप स्पर्धेतील सर्वाधिक २०२ धावसंख्या भारताने उभारल्यानंतर श्रीलंका संघाने सलामीवीर कुसल मेंडिस (०) याला पहिल्या षटकात गमावले. हार्दिकने त्याला बाद केले. त्यानंतर पथुम निस्सांका व कुसल परेरा या जोडीने धमाकेदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी करुन सामन्यातील रोमांच वाढवला. या भागीदारीने श्रीलंका संघ विजयासमीप येण्यास मोठी मदत झाली. कुसल परेरा ३२ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला. वरुण चक्रवर्तीने त्याला बाद करुन संघाला दुसरे यश मिळवून दिले.

चरिथ असलंका (५), कामिंडू मेंडिस (३) यांना स्वस्तात बाद करण्यात भारताला यश आले. मात्र, पथुम निस्सांका याने स्फोटक फलंदाजी करत दमदार शतक ठोकले. त्याने ५८ चेंडूंत १०७ धावांची तुफानी शतकी खेळी केली. त्याने सहा टोलेजंग षटकार व सात चौकार मारले. २०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हर्षित राणाने त्याला बाद करुन मोठा धक्का दिला. वरुण चक्रवर्तीने त्याचा अप्रतिम झेल टिपला. श्रीलंकेने २० षटकात पाच बाद २०२ धावा काढून बरोबरी साधली. दासुन शनाका याने नाबाद २२ धावा फटकावत सामना टाय करण्यात मोठी भूमिका बजावली. भारतातर्फे हार्दिक पंड्या (१-७), अर्शदीप सिंग (१-४६), हर्षित राणा (१-५४), कुलदीप यादव (१-३१), वरुण चक्रवर्ती (१-३१) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

भारताची धमाकेदार कामगिरी 
आशिया कप स्पर्धेतील शेवटच्या सुपर फोर सामन्यात भारतीय संघाची धमाकेदार कामगिरी शुक्रवारी देखील सुरू राहिली. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात २०२ धावा केल्या. अभिषेक शर्माने श्रीलंकेविरुद्ध त्याच्या नेहमीच्या शैलीत खेळ करत फक्त ३१ चेंडूत ६१ धावा केल्या. संजू सॅमसनने २३ चेंडूत ३९ धावा केल्या आणि तिलक वर्माने ३४ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. २०२५ च्या आशिया कपमध्ये संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती. टी २० आशिया कपमधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल तीन चेंडूत फक्त चार धावा करू शकला. कर्णधार सूर्यकुमार यादव देखील चांगली कामगिरी करू शकला नाही, त्याने बाद होण्यापूर्वी १३ चेंडूत १२ धावा केल्या.

अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन चमकले

अभिषेक शर्माने आशिया कप मधील त्याचे चौथे अर्धशतक झळकावले. अभिषेकने फक्त ३१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार मारून ६१ धावा केल्या. तिलक वर्मा ३४ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारून नाबाद राहिला. संजू सॅमसनने २३ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार मारून ३९ धावा केल्या.

हार्दिक पंड्या पुन्हा एकदा अपयशी

हार्दिक पंड्या फक्त २ धावांवर बाद झाला. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याची बॅट सातत्याने शांत राहिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या १३ टी २० डावांमध्ये हार्दिक पंड्याला १२.५ च्या सरासरीने फक्त १५० धावा करता आल्या आहेत, ज्याचा सर्वोच्च धावसंख्या २९ आहे.

श्रीलंकेसाठी एकूण पाच गोलंदाजांनी विकेट घेतल्या. महेश तीक्षणाने ३६ धावांत १, दुष्मंथा चामीरा याने ४० धावांत १, वानिंदू हसरंगा याने ३७ धावांत १, दासुन शनाका याने २३ धावांत १ आणि असलंकाने १८ धावांत १ बळी घेतला. 

अभिषेक शर्माची विक्रमी कामगिरी 
या आशिया कपमध्ये अभिषेक शर्मा याने आतापर्यंत सहा डावांत ३०९ धावा केल्या आहेत. एकाच आशिया कप टी २० आवृत्तीत ३०० पेक्षा जास्त धावा करणारा अभिषेक पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी, एकाच आशिया कप टी २० स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर होता. २०२२ च्या आशिया कपमध्ये त्याने सहा डावांत २८१ धावा केल्या. दरम्यान, २०२२ च्या आशिया कपमध्ये विराट कोहलीने पाच डावात २७६ धावा केल्या. अभिषेकने या आशिया कपमध्ये इतर अनेक मोठ्या विक्रमांची बरोबरी केली आणि काही विक्रम मोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *