
नागपूर : नागपूरच्या चार खेळाडूंनी प्रतिष्ठित आयर्नमॅन इटली एमिलिया-रोमाग्ना स्पर्धेत भारताचे अभिमानाने प्रतिनिधित्व करत दमदार कामगिरी केली. एड्रियाटिक समुद्रकिनाऱ्यावरील सेर्व्हियामध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नागपूरकरांनी फुल आयर्नमॅन (२२६ किमी) आणि आयर्नमॅन ७०.३ (११३ किमी) या दोन्ही प्रकारांमध्ये यशस्वीरीत्या फिनिश लाइन पार केली.
पूर्ण आयर्नमॅनमध्ये ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी मॅरेथॉन धावणे या जगातील सर्वात कठीण एकदिवसीय क्रीडा आव्हानाचा समावेश असतो. या कठीण शर्यतीत वैभव अंधारे यांनी १५ तास ४६ मिनिटे ३६ सेकंद वेळेत पूर्ण अंतर पार केले. प्रसाद खेडकर यांनी १५ तास ४७ मिनिटे ०८ सेकंद वेळेत फिनिश गाठली. तर आयर्नमॅन ७०.३ प्रकारात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे या आव्हानात्मक टप्प्यांवर विजय मिळविताना विश्वजित वानखडे यांनी ७ तास ४७ मिनिटे ३३ सेकंद तर शौनक देव यांनी ७ तास ५१ मिनिटे ३३ सेकंद अशी वेळ नोंदवली.
“सेर्व्हियामध्ये अंतिम रेषा ओलांडणे हे स्वप्न साकार करणारे आणि आयुष्यभर लक्षात राहणारे क्षण होते. ही कामगिरी केवळ वैयक्तिक ध्येय नसून आपल्या देशातील सहनशक्ती क्रीडा संस्कृतीचे प्रतिबिंब आहे,” असे फुल आयर्नमॅन फिनिशर वैभव अंधारे यांनी सांगितले.
२०१७ मध्ये पहिल्यांदा झालेल्या आयर्नमॅन इटली एमिलिया-रोमाग्ना स्पर्धेने अल्पावधीतच युरोपातील ट्रायथलॉन कॅलेंडरमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. किनारपट्टीचा रम्य नजारा, सपाट पण वाऱ्याने आव्हानात्मक कोर्स आणि हजारो प्रेक्षकांचा उत्साह यामुळे ती जगभरातील व्यावसायिक व हौशी ट्रायथलीट्ससाठी सर्वाधिक संस्मरणीय स्पर्धा ठरली आहे. नागपूरच्या खेळाडूंच्या या यशामुळे शहराच्या क्रीडा परंपरेत आणखी एक अभिमानाचा अध्याय जोडला गेला आहे.