
ठाणे (समीर परब) ः एस एम एम हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या प्री-प्रायमरी विभागात नुकताच ‘पाणी’ हा प्रकल्प उत्साहात राबविण्यात आला. हा प्रकल्प प्ले-वे पद्धतीने शिकवण्यात आला आणि त्यामुळे लहान मुलांना खेळत-खेळत शिकण्याची संधी मिळाली.
संपूर्ण वर्गखोलीला ‘वॉटर वर्ल्ड’ चे स्वरूप देण्यात आले होते. सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांनी पाण्याशी संबंधित विविध विषयांचे सादरीकरण केले. पाण्याचे स्रोत, उपयोग, वर्गीकरण, गुणधर्म, जलचर प्राणी तसेच पाणी चक्र याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून दिले ज्यातून त्यांचे ज्ञान आणि समज स्पष्ट झाली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, विश्वस्त मंडळातील सदस्य तसेच पालक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी विशेषतः महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभाग संपर्कप्रमुख व ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी भेट देऊन मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी असे नमूद केले की, “लहान मुलांच्या गटामध्ये असे प्रकल्प प्रदर्शन घेणे ही एक आदर्श संकल्पना असून अशा पद्धतीने केलेले कार्य त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.”
या प्रकल्पाच्या यशामध्ये प्री-प्रायमरी विभागातील शिक्षकवृंद व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. मुख्याध्यापिका नीता मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडला.