
सासवड ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीतर्फे एम एस काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय सासवड येथील खेळाडूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्य पदक पटकावून दैदिप्यमान कामगिरी केली.
फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात ६१ किलो वजन गटात श्रीनाथ डांगे याने सुवर्णपदक पटकावले. ७४ किलो वजन गटात प्रकाश कार्ले (सुवर्णपदक), ९७ किलो वजन गटात प्रतीक जगताप (सुवर्णपदक), ९२ किलो वजन गटात यशराज काळे (रौप्यपदक) यांनी चमकदार कामगिरी नोंदवत पदकांची कमाई केली आहे. तसेच ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात ८२ किलो वजन गटात अजिंक्य शिंदे याने रौप्य पदक आणि ९७ किलो वजन गटात विशाल जाधव याने रौप्यपदक संपादन केले.
या सर्व खेळाडूंची बारामती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या घवघवीत यशाबद्दल खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ बी यु माने, डॉ संजय झगडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांनी अभिनंदन केले. सर्व विजेते खेळाडू श्री शिवाजी प्रसारक मंडळ, सासवड संचलित छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे प्रशिक्षक तानाजी बोडरे व माऊली खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.