
नागपूर ः अतिशय अटीतटीच्या झालेल्या पुरुष कबड्डीच्या अंतिम सामन्यात सावनेर येथील हरिभाऊ आदमने महाविद्यालयाने देवळी येथील ज्ञानभारती महविद्यालयाचा ४ गुणांनी पराभव करीत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा जिंकली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि सक्करदरा येथील श्री बिंझाणी नगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुष विभागातील आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आदमने कॉलेज संघाने रोमांचक विजयासह विजेतेपद पटकावले. स्पर्धा बिंझाणी नगर महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम येथे पार पडली.
मध्यंतरापर्यंत २०-२० गुणांनी बरोबरीत असलेला सामना अंतिम वेळ संपल्यावर सुद्धा ३७-३७ ने बरोबरीत होता. मात्र त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये दोन्ही संघांनी केलेल्या ५-५ चढाईनंतर ८-४ अशी आघाडी घेत हरिभाऊ आदमने महाविद्यालयाने ४ गुणांनी चित्तथरारक विजय साकार केला. तत्पूर्वी तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात देवळीच्या एसएसएनजे महाविद्यालयाने तुमसरच्या एस एन मोर महाविद्यालयाचा २१-१७ असा ४ गुणांनी पराभव करीत स्पर्धेतील तृतीय स्थान पटकावले.
अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षिस वितरण समारंभास कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुजित मेत्रे, प्रमुख पाहुणे संजय भंसाली तसेच अजनीचे सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे आणि विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ संभाजी भोसले आदी मान्यवरांद्वारे स्पर्धेतील विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
या बक्षिस वितरण समारंभाचे प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख डॉ संजय चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा कल्पना मिश्रा यांनी केले. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी सचिन सूर्यवंशी यांनी सांभाळली. या प्रसंगी प्राचार्य डॉ विजय दातारकर, प्राचार्य डॉ विरेंद्र जुमडे, प्रा पराग बन्सोले, डॉ भीमराव पवार, प्रा मनोज आंबटकर, डॉ सविता भोयर, डॉ धनराज मुंगल, डॉ जयकुमार क्षिरसागर, डॉ दिलीप तभाने, डॉ निशांत तिपटे, डॉ दिनेश किमटा, प्रा वैभव झंझाळ, प्रा पलाश जोशी, मंगेश ठवरे आदी मान्यवर उपस्थित होते.