
पुणे ः महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सन २००६ ते २०१८ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
पुणे येथे २१ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या शासकीय परिषद सभेत तसेच शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-पुणे येथे २८ सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी असोसिएशनच्या उपाध्यक्षा अश्विनी पाटील होत्या. यापूर्वी अध्यक्ष असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त अध्यक्षस्थानी शासकीय परिषदेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेतही अजितदादा पवार यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ चंद्रजित जाधव यांनी सांगितले. भारतीय खो-खो महासंघाचे खजिनदार गोविंद शर्मा, अविनाश सोलवट, संजीवराजे नाईक निंबाळकर, अश्विनी पाटील, सचिन गोडबोले, संदीप तावडे, जनार्दन शेळके, पवन पाटील, रणजित सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, जय कवळी, प्रदीप गंधे, अॅड रविराज परमाने, डॉ उदय डोंगरे यांनी अजितदादा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.