
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य विभाग अंतर्गत करिअर संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते हे होते तर प्रमुख पाहुणे व वक्ते सीए चेतन गट्टानी, भार्गवी खिस्ती, सीए महेश इंदानी हे उपस्थित होते. वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॉ आर बी लहाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात वाणिज्य विभागाअंतर्गत दरवर्षी होणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांविषयी सांगत विद्यार्थ्यांनी त्यात कशा पद्धतीने सहभागी व्हावे या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते सीए चेतन गट्टानी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व बोस्टन इन्स्टिट्युट ऑफ एनालिटिक्स या विषयी माहिती सांगितली. अभ्यासक्रमाची तयारी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच भार्गवी खिस्ती यांनी विद्यार्थ्यांना बोस्टन इन्स्टिट्यूट ऑफ एनालिटिक्सद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध डिप्लोमा व प्रमाणपत्र कोर्सेसची सखोल माहिती दिली. यामध्ये उत्पादन व्यवस्थापन व विश्लेषण, आर्थिक व्यवस्थापन व विश्लेषण, डिजिटल व्यवस्थापन व विश्लेषण, विधी विश्लेषण, मानवी संसाधन व्यवस्थापन व विश्लेषण इत्यादी कोर्सेस विद्यार्थ्यांना भविष्यात विविध करियर संधी निर्माण करतील असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.
सीए महेश इंदानी यांनी विद्यार्थ्यांना बोस्टन इन्स्टिट्यूट ऑफ एनालिटिक्सद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध डिप्लोमा व प्रमाणपत्र कोर्सेसची सखोल माहिती दिली. करावयाची तयारी याविषयी मार्गदर्शन करत आपण हे क्षेत्र का निवडावे व आज या क्षेत्राची आवश्यकता व त्यात उपलब्ध संधी त्यामुळे दरवर्षी होणारी भरती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत विविध प्रकारचे कौशल्य आधारित कोर्सेस करून आपली योग्यता वाढविणे ही आजच्या काळाची गरज आहे.वाणिज्य विभाग पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना करिअर संधी वाढविण्यासाठी नेहमीच चांगले उपक्रम राबवित असतात. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन स्वतः चा फायदा करून घेणे गरजेचे आहे.
सदरील कार्यक्रमासाठी २५० विद्यार्थी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेश लहाने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ कैलाश ठोंबरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.