
किलिमांजारो शिखर सर करणारे सर्वात दुसरे वयस्कर जोडपे
छत्रपती संभाजीनगर ः जीवनात काही स्वप्नं अशी असतात की जी वेळ, वय किंवा परिस्थितीवर अवलंबून नसतात. ती फक्त जिद्दीवर अवलंबून असतात. याच जिद्दीची जिवंत साक्ष द्यावी अशी कामगिरी भारतीय-अमेरिकन महाजन दाम्पत्याने घडवून आणली आहे. ६३ वर्षांचे अपराजित महाजन आणि ६० वर्षांच्या सबरीना महाजन यांनी आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलिमांजारो (१९,५०० फूट / ५६८१ मीटर) सर करून इतिहास रचला. “सर्वात वयस्कर भारतीय दाम्पत्य” आणि “जगातील दुसरे सर्वात वयस्कर दाम्पत्य” म्हणून त्यांचे नाव नोंदले गेले.
वर्षभर कसून तयारी
हा विक्रम याआधी एका दक्षिण भारतीय दाम्पत्याच्या नावावर होता. मात्र महाजन दाम्पत्याने ती उंचीही गाठली आणि मागे टाकली. एक वर्षभर चाललेल्या तयारीनंतर, ३६० एक्सप्लोरर टीमसोबत त्यांनी या कठीण मोहिमेला सुरुवात केली. हा प्रवास फक्त सहा दिवसांचा होता, पण प्रत्येक दिवसाने त्यांची मानसिक आणि शारीरिक कसोटी घेतली. शेवटचा टप्पा तर सर्वात कठीण – सलग २८ तासांचा अखंड चालण्याचा प्रवास. मार्गातील अनुभव महाजन दाम्पत्याला मोहिमेदरम्यान एक जाणवलेले वास्तव खूपच खटकले – “आम्ही अब्जावधी भारतीय असलो तरी, ४५ वर्षांवरील भारतीय गिर्यारोहक तिथे आढळलेच नाहीत. मात्र जपानी, नॉर्वेजियन व अन्य अनेक देशांतील वयस्कर गिर्यारोहक मात्र मोठ्या संख्येने भेटले. ”ही बाब त्यांच्या मनाला विचार करायला लावणारी ठरली. वय वाढले की जीवन फक्त आठवणींच्या गोष्टी सांगण्यासाठी नाही, तर अजून नवे अनुभव घेण्यासाठीही असते – हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
यशामागची ताकद
महाजन दाम्पत्याच्या यशामागे फक्त त्यांची इच्छाशक्ती नव्हती, तर त्यांच्या कुटुंबीयांचा आणि ३६० एक्सप्लोरर टीमचा देखील मोठा वाटा होता. गेल्या एका वर्षापासून केलेल्या नियोजन, सराव आणि मानसिक तयारीमुळेच हे यश शक्य झाले. प्रेरणेचा संदेशमहाजन दाम्पत्याचा विजय हा फक्त एक विक्रम नाही, तर जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी एक संदेश आहे – “वय हे फक्त अंक आहेत. जिद्द असेल, तर शिखरावर पोहोचणे कधीही अशक्य नाही.”किलिमांजारो सर करण्याची ही कहाणी केवळ गिर्यारोहणाची नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे. महाजन दाम्पत्याने दाखवून दिले की, जीवनाच्या उत्तरार्धात सुद्धा नवी स्वप्नं पूर्ण करता येतात आणि जगासमोर एक आदर्श उभा करता येतो.
अभिमानाचा क्षण
महाजन दाम्पत्याचे हे यश केवळ ३६० एक्सप्लोररसाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या चिकाटीने आणि धैर्याने वृद्धापकाळातही धाडसी ध्येयनिष्ठा गाठता येते याचा संदेश जगभर पोहोचवला आहे.