
ईराणी ट्रॉफी ः विदर्भ पाच बाद २८० धावा
नागपूर ः अथर्व तायडे (नाबाद ११८) आणि यश राठोड (९१) यांच्या शानदार फलंदाजीमुळे रणजी चषक विजेत्या विदर्भ संघाने ईराणी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवसअखेर शेष भारत संघाविरुद्ध पाच बाद २८० धावसंख्या उभारली आहे.
विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अथर्व तायडे व अमन मोखाडे यांनी ४० धावांची सलामी दिली. अमन मोखाडे (१९), ध्रुव शोरे (१८), डॅनिश मालेवार (०) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे विदर्भ संघाची स्थिती ३ बाद ८० अशी झाली.
अथर्व तायडे व यश राठोड या जोडीने चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. यश राठोडचे शतक नऊ धावांनी हुकले. त्याने सहा चौकार व एक षटकार ठोकत ९१ धावा काढल्या. कर्णधार अक्षय वाडकर (५) याला आकाश दीप याने बाद करुन मोठा धक्का दिला. अथर्व तायडे याने २४० चेंडूंचा सामना करत नाबाद ११८ धावांची शानदार शतकी खेळी केली आहे. कठीण परिस्थितीत चिवट झुंज देत त्याने १२ चौकार व १ षटकार मारला आहे. यश ठाकूर ४ धावांवर खेळत आहे.
शेष भारत संघाकडून मानव सुथार हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६४ धावांत तीन विकेट घेतल्या. आकाश दीप याने ३५ धावांत दोन बळी घेतले.