
इंदूर ः अॅशले गार्डनरच्या आक्रमक शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा ८९ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडकडून सोफी डिव्हाइनचे शतक (११२) व्यर्थ ठरले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ३२७ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनरने सर्वाधिक ११५ धावा केल्या. तिने ८३ चेंडूंचा सामना केला आणि १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने संघाला ३०० धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. न्यूझीलंडकडून जेस केर आणि ली ताहुहू यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर ब्री एलिंग आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
न्यूझीलंडची खराब सुरुवात
न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर ही सलामी जोडी पहिल्याच षटकात बाद झाली आणि त्यांना त्यांचे खाते उघडता आले नाही. अमेलिया केर (३३) आणि कर्णधार सोफी डिव्हाईन या जोडीने ७५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ब्रुक हॅलिडे (२८), मॅडी ग्रीन (२०), इसाबेला गेझ (२८) यांची झुंज अयशस्वी ठरली. न्यूझीलंड संघ ४३.२ षटकात २३७ धावांवर सर्वबाद झाला. सोफी मोलिनेक्स (३-२५), अॅनाबेल सदरलँड (३-२६), अलाना किंग (२-४४) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.