
कानपूर ः भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेच्या समाप्तीनंतर तीन सामन्यांची अनधिकृत एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तब्बल १७१ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. कर्णधार श्रेयस अय्यरचे आक्रमक शतक आणि त्यानंतर गोलंदाजांची प्रभावी कामगिरी महत्वाची ठरली.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय अ संघाने पहिला सामना १७१ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली आणि श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्य यांच्या शतकांच्या जोरावर ५० षटकांत ४१३ धावा केल्या आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाला २४२ धावांत गुंडाळले.
निशांत सिंधूने शानदार गोलंदाजी
भारतीय अ संघाविरुद्ध ४१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या रूपात ४० धावांवर त्यांची पहिली विकेट गेली. ते २३ धावा काढून बाद झाले. त्यानंतर कूपर कॉनॉली आणि मॅकेन्झी हार्वे यांनी १०० धावसंख्येचा टप्पा ओलांडला. कॉनॉली ३३ धावांवर बाद झाला तर मॅकेन्झी ६८ धावांवर बाद झाला. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन अ संघाने वेगाने विकेट्स गमावल्या, २०४ धावांवर आठ विकेट्स गमावल्या आणि ३३.१ षटकांत २४२ धावांवर बाद झाला.
डावखडी फिरकी गोलंदाज निशांत सिंधूने भारतीय अ संघाकडून कामगिरी केली, त्याने ६.१ षटकांत ५० धावा देत चार विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोईनेही दोन विकेट्स घेतल्या, तर युधवीर सिंग, गुर्जपनीत सिंग, सिमरजीत सिंग आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.
श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्य यांची दमदार फलंदाजी
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध टीम इंडियाच्या फलंदाजी कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांश आर्यने ८४ चेंडूत १०१ धावा करत डावाची सुरुवात केली, तर कर्णधार श्रेयस अय्यरची फलंदाजी मधल्या फळीत प्रभावी होती, त्याने ८३ चेंडूत ११० धावा केल्या, ज्यात १२ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या आयुष बदोनीने फक्त २७ चेंडूत ५० धावांची शानदार खेळी केली. दोन्ही संघांमधील या अनधिकृत एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना ३ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.