
छत्रपती संभाजीनगर ः शहरातील सिडको एन ३ मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा ही केवळ क्रीडा स्पर्धा नव्हे तर तरुणाईच्या उत्साहाचा, संघभावनेचा आणि क्रीडासंस्कारांचा मोठा सोहळा ठरला. मनपा हद्दीतील १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित शाळांनी सहभागी होऊन प्रेक्षकांची दाद मिळवली. वुड्रिज स्कूल व देवगिरी कॉलेज या संघांनी विजेतेपद पटकावले.
दोन दिवस रंगलेल्या या सामन्यांमध्ये प्रत्येक संघाने विजयासाठी दिलेला संघर्ष हा तितकाच प्रेरणादायी होता. शेवटी मुलांच्या गटात वुड्रिज स्कूलने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली, तर देवगिरी महाविद्यालयने उपविजेतेपद मिळवले. एमजीएमने तृतीय स्थान पटकावले, तर द वर्ल्ड हायस्कूल संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलींच्या गटात मात्र देवगिरी कॉलेजने उत्कृष्ट संघभावना आणि अचूक रणनीती या जोरावर विजेतेपद मिळवले. रिव्हल डेल हायस्कूलने उपविजेतेपद, तर एमजीएमने तृतीय स्थान पटकावले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, स्पर्धा प्रमुख सचिन परदेशी, तालुका व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव मंजित दारोगा व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव गणेश कड, तसेच स्वाभिमान क्रीडा मंडळाचे क्रीडा विभाग प्रमुख पंकज परदेशी आणि प्रशांत बुरांडे यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. पंच म्हणून विपूल कड, अनिस साहुजी, सौरभ ढीपके, आकाश टाके, समाधान बेलेवार, धनंजय कुसाळे, विजय मोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
ही स्पर्धा केवळ निकालापुरती मर्यादित नव्हती, तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयीची आवड आणि स्पर्धात्मकता वाढवण्याचा संदेशही देऊन गेली. मैदानावर दिसलेली शिस्त, सहकार्य आणि जिद्द हीच पुढील पिढीतील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी ठरेल, यात शंका नाही.बास्केटबॉल हा जलद गतीचा आणि संघभावना अधोरेखित करणारा खेळ आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धांनी त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित केले असून, अशा उपक्रमांतून उद्याचे चॅम्पियन्स घडतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.