
कोलंबो ः महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघाने पाकिस्तान संघाचा सात गडी राखून पराभव केला. बांगलादेशच्या प्रभावी गोलंदाजीनंतर रुबिना हैदर हिचे नाबाद अर्धशतक लक्षवेधक ठरले.
बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानी महिला संघ फक्त १२८ धावांवर बाद झाला. तळाच्या फळीच्या फलंदाजांमुळे पाकिस्तानने शेवटच्या पाच विकेटमध्ये ६२ धावा केल्या ज्यामुळे त्यांना १०० धावांचा टप्पा ओलांडता आला.
पाकिस्तानची विकेट पडण्याची सुरुवात पहिल्याच षटकात झाली. बांगलादेशची गोलंदाजी इतकी घट्ट होती की कोणत्याही गोलंदाजाने ५ पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या नाहीत. बांगलादेशकडून शोर्ना अख्तरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. नाहिदा अख्तर आणि मारुफा अख्तरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. निशिता अख्तर, फहिमा खातून आणि राबिया खातून यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
बांगलादेश संघाने ३१.१ षटकात तीन बाद १३१ धावा फटकावत सात विकेट राखून सामना जिंकला. रुबिया हैदर (नाबाद ५४), निगार सुलताना (२३), शोभना मोस्टारी (नाबाद २४) यांनी दमदार फलंदाजी करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फातिमा सना (१-३०), डायना बेग (१-१४), रमीन शमीम (१-२५) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.