
नवी दिल्ली ः पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक (२०२६) स्पर्धेसाठी नामिबिया आणि झिम्बाब्वे या देशांचे संघ पात्र ठरले आहेत.
नामिबिया व झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश करून पात्रता निश्चित केली. हरारे येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये, पहिल्या उपांत्य फेरीत नामिबियाने टांझानियाचा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत झिम्बाब्वेने केनियाचा पराभव केला. यामुळे दोन्ही देशांचे आफ्रिकेतून विश्वचषक स्पर्धेतील स्थान निश्चित झाले.
आयसीसीने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे की स्पर्धेतील उर्वरित तीन स्थाने आता आशिया आणि ईएपी (पूर्व आशिया पॅसिफिक) पात्रता फेरीतून निश्चित केली जातील. नामिबियाने चार वेळा पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेत खेळले आहे आणि २०२१ मध्ये सुपर-१२ टप्प्यात पोहोचला आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वे २०२४ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही आणि यावेळी त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. भारत आणि श्रीलंका फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये संयुक्तपणे टी २० विश्वचषक आयोजित करतील.