
महाराष्ट्राला १० पदकांची कमाई
मुंबई ः हिमाचल प्रदेश राज्यातील नौनी, सोलन येथील परमार युनिव्हर्सिटीच्या हॉलमध्ये ज्युनियर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधील प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात मुंबईच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवत महाराष्ट्राला १० पदकांची कमाई करुन दिली.
मुंबई शहरातील खेळाडूंनी या भव्य स्पर्धेत आपली दणदणीत कामगिरी सादर करत महाराष्ट्राचे अभिमानाने प्रतिनिधित्व केले. या यशामागे स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक उमेश मुरकर आणि विघ्नेश मुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहाय्यक प्रशिक्षक साहिल बापेरकर यांनी खेळाडूंच्या तयारीत मोलाची भूमिका बजावली. याशिवाय आशिष महाडिक आणि विन्स पाटील यांनी राष्ट्रीय पंचपदी काम पाहत आपली विशेष ओळख निर्माण केली. शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून १ सुवर्ण व ९ कांस्य पदके जिंकत खेळाडूंनी महाराष्ट्राला अभिमानास्पद यश मिळवून दिले असून भविष्यातील आणखी मोठ्या यशाचा पाया रचला आहे.
पदक विजेते खेळाडू
सुवर्ण पदक – विघ्नेश परब (लो किक), कांस्य पदक – ध्रुव पालव (लो किक), कांस्य पदक – प्रज्ञेश पटवर्धन (पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, टीम पॉईंट फाईट), कांस्य पदक – सय्यद अहमद (पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, टीम पॉईंट फाईट), कांस्य पदक – यथार्थ बुदमाला (लाईट कॉन्टॅक्ट, टीम पॉईंट फाईट).