
हिंगोली ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका क्रीडा संयोजक औंढा नागनाथ यांच्या वतीने रेशन्स इंग्लिश स्कूल, शिरड शहापूर येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा उखळीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले.
१४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात उखळी शाळेच्या संघाने जिल्हा परिषद शाळा पिंपळदरीचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. तर १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात उखळी शाळेच्या मुलींनी सरस्वती महाविद्यालय, जवळा बाजार यांचा पराभव करत विजेतेपद मिळवले. दोन्ही संघ आता वसमत येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत औंढा नागनाथ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या यशामध्ये महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तांत्रिक समिती अध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ नागनाथ गजमल यांच्यासह अमोल मुटकुळे, सुरज शिंदे व मनोजकुमार टेकाळे या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या या दुहेरी विजयानंतर मुख्याध्यापक रमेश लांबुटे, सरपंच पुंडलीकराव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू गायकवाड आदींनी तसेच उखळी गावातील मान्यवर व ग्रामस्थांनी खेळाडूंचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
उखळी शाळेच्या संघाला मिळालेले हे यश गावासाठी अभिमानाची बाब ठरली असून जिल्हास्तरीय पातळीवरही या संघांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.