
छत्रपती संभाजीनगर ः मनपा हद्दीतील शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत १४ वयोगटातील मुलींच्या गटात नाथ व्हॅली स्कूल संघाने अजिंक्यपद पटकावले, तर वुड्रिज स्कूल संघाने उपविजेतेपद संपादन केले.
ही स्पर्धा सिडको एन-३ बास्केटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आली असून १४ वर्षांखालील मुलींच्या गटात तब्बल २५ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात नाथ व्हॅली संघाने जबरदस्त ताळमेळ आणि अचूक बास्केट्सच्या जोरावर वुड्रिज स्कूल संघाचा ३७-१२ असा धडाकेबाज पराभव केला. नाथ व्हॅलीच्या खेळाडूंनी एकदिलाने खेळ करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. उपविजेता ठरलेल्या वुड्रिज स्कूल संघाने मात्र बास्केटच्या अनेक संधी गमावल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात शारदा मंदिर शाळेने किड्स प्राईड शाळेवर ११-२ असा सहज विजय मिळवला. याआधी उपांत्य फेरीत नाथ व्हॅली संघाने किड्स प्राईडला तर वुड्रिज स्कूल संघाने शारदा मंदिर शाळेला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, स्पर्धा प्रमुख सचिन परदेशी, तालुका व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव मंजित दारोगा व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव गणेश कड, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे बास्केटबॉल प्रमुख पंकज परदेशी, प्रशांत बुरांडे, तसेच बास्केटबॉल पंच विपूल कड, अनिस साहुजी, सौरभ ढीपके, आकाश टाके, समाधान बेलेवार, सुरज कदम, धनंजय कुसाळे, विजय मोरे आदींनी पुढाकार घेतला होता.
अंतिम निकाल १४ वर्षांखालील मुलींचा गट
प्रथम – नाथ व्हॅली स्कूल, द्वितीय – वुड्रिज स्कूल, तृतीय – शारदा मंदिर शाळा, चतुर्थ – किड्स प्राईड स्कूल.