भारतीय फलंदाजांचा दमदार खेळ; राहुल, जुरेल आणि जडेजाची शतके

  • By admin
  • October 3, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

भारताची २८६ धावांची आघाडी, वेस्ट इंडिजवर दबाव वाढला

अहमदाबाद ः वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी जबरदस्त खेळाची चमक दाखवली. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. दिवसाखेरीस भारताने पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावा करत २८६ धावांची भक्कम आघाडी मिळवली. जडेजा १०४ धावांवर नाबाद असून त्याला वॉशिंग्टन सुंदर (९ धावा) साथीला आहे.

भारतीय संघाने २ बाद १२१ धावांवरून खेळ पुढे सुरू केला. शुभमन गिल (५०), केएल राहुल (१००) आणि ध्रुव जुरेल (१२५) यांनी दमदार खेळी केली. राहुलने जवळपास नऊ वर्षांनी भारतीय भूमीवर कसोटी शतक झळकावले. गिल-राहुल जोडीने ९८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल बाद झाला तरी जुरेल व जडेजाने डाव सावरला.

जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत इतिहास रचला. तो वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पाचवा भारतीय ठरला. त्याने २१० चेंडूत १२५ धावा केल्या. त्याच्या साथीला जडेजाने खणखणीत शतक ठोकत सहाव्या शतकाची नोंद केली. या जोडीने २०५ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत नेले.

वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने दोन बळी घेतले, तर जेडेन सील्स, जोमेल वॉरिकन आणि खॅरी पियरे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडिज केवळ १६२ धावांवर गारद झाले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारताची आघाडी आणखी वाढवण्याचा प्रयत्न असेल, तर वेस्ट इंडिजसमोर भारतीय फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *