
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः गौरव शिंदे, मुकीम शेख सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इथिकल क्रिकेट अकादमी संघाने रोमांचक सामन्यात मायटी ग्लॅडिएटर्स संघाचा तीन धावांनी पराभव केला. दुसऱया सामन्यात असरार ११ संघाने साऊथ वेस्ट मल्टीमीडिया संघावर ५६ धावांनी विजय नोंदवला. या लढतींमध्ये गौरव शिंदे आणि मुकीम शेख यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. इथिकल क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १९.५ षटकात सर्वबाद १५० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मायटी ग्लॅडिएटर्स संघ २० षटकात सात बाद १४७ धावा काढू शकला. इथिकल अकादमीने हा रोमांचक सामना अवघ्या ३ धावांनी जिंकला.
या सामन्यात गौरव शिंदे याने आक्रमक अर्धशतक ठोकले. त्याने ५५ धावा करताना सहा चौकार व एक षटकार मारला. राजेंद्र चोपडा याने तीन षटकार व एक चौकार मारुन ३९ धावा फटकावल्या. अनिल थोरे याने सहा चौकारांसह ३४ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत ओमकार मोगल याने ३० धावांत तीन गडी बाद केले. झमीर याने ३० धावांत तीन बळी घेतले. मयूर वैष्णव याने १७ धावांत दोन गडी बाद केले.
मल्टीमीडिया संघ पराभूत
दुसरा सामना असरार ११ संघाने साऊथ वेस्ट मल्टीमीडिया संघाला ५६ धावांनी पराभूत करुन आगेकूच केली. या सामन्यात असरार ११ संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात नऊ बाद १९६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. साऊथ वेस्ट मल्टीमीडिया संघ १८.५ षटकात नऊ बाद १४० धावा काढू शकला. असरार ११ संघाने ५६ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात सचिन वाठोरे (६८), मुकीम शेख (६६), शाहरूख (४८) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. सचिनने तीन षटकार व आठ चौकार मारले. मुकीमने नऊ चौकार तर शाहरूखने पाच चौकार व तीन षटकार मारले.
गोलंदाजीत दादासाहेब (३-३६), मुकीम शेख (२-२) व जिबरन किरमानी (२-११) यांनी प्रभावी गोलंदाजी करुन विकेट्स घेतल्या.