
पुणे : अॅडव्हेंचर्स बियाँड बॅरीयर्स फाउंडेशन (एबीबीएफ) या संस्थेच्या वतीने दुसऱ्या रन इन सिंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे १४ फेब्रुवारी 2026 रोजी आयोजन करण्यात आले असून ‘लव्ह टू शो अप’ या घोषवाक्या अंतर्गत परस्पर बंधुभाव व स्नेहाचे दर्शन या स्पर्धेमुळे घडून येणार आहे.
रन इन सिंक स्पर्धेला बजाज फिनसर्व्ह उद्योग समूहाने आपल्या सामाजिक उपक्रम विभागांतर्गत पाठिंबा दिला असून टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स आणि इ क्लर्क्स या उद्योगांनी सह प्रायोजकत्व दिले आहे. उपाध्याय फाउंडेशन या संस्थेचे सामाजिक सहभाग म्हणून सहकार्य मिळाले आहे. बजाज फिनसर्व्ह आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे. तसेच, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या डॉ गीता शिंदे व धनंजय भोळे यांनीही सलग दुसऱ्या वर्षी आपला पाठिंबा दिला आहे.
पहिल्या वर्षी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सर्वसाधारण धावपटूंसह अपंगत्व असलेल्या व्यक्ती मिळून ५००० हून अधिक धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. आता रन इन सिंक २०२६ या स्पर्धेतही अपंगत्व असलेले व्यक्ती आणि अपंगत्व नसलेले धावपटूही क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून अपंगत्व असलेल्या व्यक्तींबद्दल समाजात परानुभूती निर्माण करतील अशी आयोजकांना खात्री वाटते. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक धावपटूच्या क्षमतेचा सन्मान केला जाईल आणि मानवी परस्पर संबंधांमध्ये स्नेहाचे विशेष पर्व स्थापित होईल, अशी आयोजकांना खात्री वाटते.
एबीबीएफ संस्थेचे संस्थापक दिव्यांशु गणात्रा म्हणाले की, सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव रोमांचकारी आहे. पहिल्या सत्रात आम्हाला आलेला अनुभव अविश्वसनीय होता आणि दुसऱ्या वर्षी त्यापेक्षा भव्य व रोमांचकारी प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. #लव्ह टू शो अप हे स्पर्धेसाठी केवळ घोषवाक्य नसून संपूर्ण देशातील क्रीडा प्रेमींना आपल्या अपंगत्व असलेल्या बांधवांसह सहभागी होण्याचे आमंत्रण आहे. स्पर्धेसाठी जागा मर्यादित असून सर्वांनी नाव नोंदणी करावी असे आम्ही आवाहन करतो.
उपाध्याय फाउंडेशनच्या संस्थापिका ब्रिंदा उपाध्याय म्हणाल्या की, रन इन सिंक या स्पर्धेमुळे सर्व क्षमतांचे धावपटू एकत्र येणार आहेत. इतकेच नव्हे तर, दृष्टिहीन धावपटूंना या निमित्ताने पाठिंबा देताना आम्हाला विशेष अभिमान वाटत आहे. या स्पर्धेत प्रत्येक धावपटू आपल्या सहभागी स्पर्धकाच्या सहाय्याने पुढे सरकणार असून बंधू भावाचे वेगळे दर्शन घडणार आहे. रन इन सिंक स्पर्धेच्या प्रवेशिका सर्व तंदुरुस्ती पातळी व क्षमता असलेल्या स्पर्धकांसाठी खुल्या असून चालता येणाऱ्या, धावता येणाऱ्या व अगदी व्हीलचेअरवर असलेल्या स्पर्धकांसाठीही स्पर्धा खुली आहे. विविध क्षमतांच्या धावपटूंसाठी विविध गट करण्यात आले असून स्पर्धकांना साहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक व सहाय्यक प्रत्येक स्पर्धकासाठी उपस्थित असणार आहे. तसेच स्वतःचे सहाय्यक व स्वयंसेवक आणणाऱ्याचेही स्वागत आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी www.runinsync.in या वेबसाइटवर नोंदणी करता येणार आहे.
सर्व प्रकारच्या क्षमता व अपंगत्व असलेल्या स्पर्धकांसाठी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी या स्पर्धेतील प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. तसेच या स्पर्धेतून मिळालेले सर्व उत्पन्न अँडव्हेंचर्स बियाँड बॅरियर्स (एबीबीएफ) या संस्थेला अपंग व विशेष क्षमतांसाठी कार्य करण्याकरता देण्यात येणार आहे.
एबीबीएफ बद्दल अधिक माहितीसाठी https://abbf.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, ही स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सुरू होणार असून या स्पर्धेत ३ किमी, ५ किमी व १० किमी अशा तीन गटात होणार आहे.