हॉकीचे दिग्गज लक्ष्मीनारायण गारोल यांचे निधन 

  • By admin
  • October 4, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः राज्याचे ज्येष्ठ व मान्यवर हॉकी खेळाडू लक्ष्मीनारायण गारोल (वय ९३) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्याच्या हॉकी क्षेत्रातील एक उज्वल पर्व संपले असून, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

लक्ष्मीनारायण गारोल यांनी आपल्या हॉकी कारकिर्दीची सुरुवात कॅन्टोन्मेंट हॉकी क्लब पासून केली. त्यांनी ‘राईट इन’ या स्थानावरून खेळताना आपल्या अप्रतिम कौशल्याने जिल्हा आणि राज्य संघात पाच वेळा स्थान मिळवले. त्यांनी खेळलेल्या कालखंडात राज्याने जिंकलेल्या अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांनी स्वतः त्यांचा मिलिंद कॉलेजच्या मैदानावर विशेष सत्कार केला होता, ही बाब त्यांच्या खेळातील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.

सेवानिवृत्तीनंतरही लक्ष्मीनारायण गारोल यांनी जिल्हा हॉकी संघटनेत सक्रिय सहभाग कायम ठेवला. घाटी मेडिकल कॉलेजमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत असतानाही आणि निवृत्तीनंतर त्यांनी ऑल इंडिया अजंठा कप हॉकी स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. तत्कालीन सचिव बाबूलाल लक्ष्मीनारायण यांच्यासोबत त्यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात मोलाची भूमिका बजावली.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांची अंतिम यात्रा रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नंदनवन कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरून निघेल. त्यांच्यावर अंतिम संस्कार छावणी स्मशानभूमीत करण्यात येतील.

लक्ष्मीनारायण गारोल यांच्या निधनाने हॉकीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर हॉकी संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *