
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः नकुल हजारी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यंग ११ संघाने टीम इलेव्हनचा सात गडी राखून पराभव केला. या सामन्यांमध्ये नकुल हजारी याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात टीम इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १६.२ षटकात केवळ ९ बाद ९९ धावा काढल्या. यंग ११ संघाने १०.२ षटकात तीन बाद १०३ धावा फटकावत सात गडी राखून सामना जिंकला.
या सामन्यात नितीन फोलाणे याने अवघ्य २९ चेंडूत आक्रमक अर्धशतक साजरे केले. त्याने तीन षटकार व सहा चौकारांसह ५० धावा काढल्या. प्रफुल्ल नेमाने याने २४ धावांची खेळी करताना एक चौकार व एक षटकार मारला. रोहन वैद्य याने तीन चौकारांसह २२ धावा काढल्या.
गोलंदाजीत नकुल हजारी याने १७ धावांत तीन गडी बाद करुन आपला ठसा उमटवला. संदीप सहानी याने १० धावांत दोन गडी बाद केले. सरफराज पठाण याने १६ धावांत दोन बळी घेतले.