
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अष्टपैलू खेळाडू श्रीवत्स कुलकर्णी याची महाराष्ट्राच्या अंडर १९ क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. राज्य संघात त्याची पहिल्यांदाच निवड झाली आहे आणि तो महाराष्ट्र संघासाठी संस्मरणीय कामगिरी बजावण्यासाठी कमालीचा उत्सुक आहे.
महाराष्ट्राचा अंडर १९ क्रिकेट संघ शनिवारी जाहीर करण्यात आला. निवड समितीने जाहीर केलेल्या संघात छत्रपती संभाजीनगरचा वेगवान गोलंदाज श्रीवत्स कुलकर्णी याची निवड करण्यात आली आहे.
वेगवान गोलंदाज श्रीवत्स कुलकर्णी याने अंडर १९ श्रेणीत शानदार कामगिरी करत क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला आहे. निमंत्रित क्रिकेट सामन्यात ९ सामन्यांत ४३ विकेट्स घेऊन त्याने क्रिकेट तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात एक ६-विकेट हॉलचा समावेश आहे. फलंदाजीत ९ सामन्यांत ४७२ धावा करणारा श्रीवत्स कुलकर्णी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येत आहे.
श्रीवत्स कुलकर्णी याने एक दिवसीय सामन्यात ३ विकेट्स घेतल्या तर ४ सामन्यांत १५५ धावा करत एक शतक (१२१ नॉट आउट) ठोकले. सराव सामन्यांमध्येही त्यांनी तामिळनाडू व विदर्भविरुद्ध ४ सामन्यांत ९ विकेट्स घेऊन संघासाठी मोलाचे योगदान दिले.
राज्य सराव सामन्यांमध्येही श्रीवत्स कुलकर्णी याने आपली चमक दाखवली आहे. महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू (२ सामन्यांत) ५ विकेट्स, महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ (२ सामन्यांत) ४ विकेट्स आणि महाराष्ट्र विरुद्ध मुंबई (३ सामन्यांत) ७ विकेट्स घेऊन एकूण ७ सामन्यांत १६ विकेट्स मिळवल्या. श्रीवत्स कुलकर्णी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा, एनआयएस क्रिकेट प्रशिक्षक आणि बीसीसीआय लेव्हल वन कोच सचिन लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे श्रीवत्स कुलकर्णी हा आगामी काळात गोलंदाजी आणि फलंदाजीची संतुलित कामगिरी संघासाठी मोठ्या अपेक्षांची पायरी ठरणार आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, सहसचिव शिरीष बोराळकर, कोषाध्यक्ष सुभाष पटेल, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड आदींनी श्रीवत्स कुलकर्णी व प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा यांचे अभिनंदन केले आहे.