
मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे दिवाळी सुट्टीत होणाऱ्या कोकण कप विनाशुल्क अंतिम टप्प्यातील निवड चाचणीच्या शालेय कॅरम स्पर्धेतील तिसऱ्या टप्प्यात तीर्थ ठक्कर, सुशांत कदम, आर्यन राऊत, शौर्य दिवेकर, केवल कुळकर्णी, प्रसन्न गोळे आदींनी विजयी सलामी दिली.
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन व कोकण क्रीडा प्रबोधिनी सहकार्यीत स्पर्धेमध्ये तीर्थ ठक्करने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत आरव आंजर्लेकर याला नील गेम (२५-०) देऊन प्रारंभीचा सामना जिंकला.
दादर-पश्चिम येथील सीबिईयुएम सभागृहात चौथ्या बोर्डपर्यंत ७-७ अशा बरोबरीमधील रंगलेल्या सामन्यात सुशांत कदमने सावध खेळ करीत ११-७ अशी बाजी मारली. जैतापूरच्या आर्यन राऊतने अचूक फटके साधत रविराज गायकवाडवर २५-२ असा विजय संपादन केला. अन्य सामन्यात शौर्य दिवेकरने ओम सुरतेचा १६-० असा, केवल कुळकर्णीने वेदांत मोरेचा २५-१ असा, ओमकार लोखंडेने श्लोक शिंदेचा २५-३ असा, प्रसन्न गोळेने अयान शेखचा २५-४ असा तर बालाजी काठूरेजीगिरीने श्रेयस जायभायेचा २५-२ असा पराभव केला.
उद्घाटन प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, संघटन समिती सचिव प्रमोद पार्टे, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, क्रीडापटू सुनील खोपकर आदींनी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहभागी ८२ स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.