
छत्रपती संभाजीनगर ःराज्यस्तरीय लगोरी स्पर्धेला छत्रपती संभाजीनगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यजमान छत्रपती संभाजीनगरचा मुलींचा संघ दमदार खेळ करत बाद फेरीत दाखल झाला आहे.
महाराष्ट्र लगोरी असोसिएशन व छत्रपती संभाजीनगर लगोरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, आमदार प्रदीप जैस्वाल आमदार चषक स्पर्धा प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
लगोरी हा भारतीय संस्कृतीचा पारंपरिक खेळ असून श्रीकृष्ण, पांडव काळापासून तो खेळला जात आहे. नंतर विविध देशांत या खेळाची वेगवेगळी रूपे दिसू लागली. अलीकडेच गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लगोरीचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये महाराष्ट्राने पुरुष गटात रौप्य पदकाची कमाई केली होती.
यंदाच्या अकराव्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुरुष गटातील १२ तर महिला गटातील ८ संघांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे थाटात उद्घाटन राज्याचे माजी मंत्री व कबड्डीपटू प्रा. सुरेश नवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी मार्गदर्शन करताना, “भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासणारा लगोरी हा खेळ घराघरात पोहोचावा, हीच खरी क्रीडासंस्कृती आहे” असे मत व्यक्त केले. माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांनी स्वागत केले.
स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात माती व मॅट या दोन्ही प्रकारच्या मैदानांवर साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळविल्या जात आहेत. खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळण्याची संधी मिळावी म्हणून प्रत्येक गटातील संघांना परस्परांशी भिडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
साखळी फेरीत पुरुष गटात पालघर, वाशिम, रायगड व नाशिक, तर महिला गटात पालघर, छत्रपती संभाजीनगर, पुणे व बुलढाणा या संघांनी रोमांचक लढती देत बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. सोमवारी बाद फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होणार असून उपांत्य फेरी व अंतिम सामन्यांकडे राज्यभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाचे निकाल
पुरुष गट
रायगड विजयी विरुद्ध मुंबई उपनगर (२-०), मुंबई उपनगर विजयी विरुद्ध हिंगोली (२-०), पुणे विजयी विरुद्ध नाशिक (२-१), पालघर विजयी विरुद्ध वाशिम (२-१), छत्रपती संभाजीनगर विजयी विरुद्ध जालना (२-०).
महिला गट
नाशिक विजयी विरुद्ध बुलढाणा (२-०), पालघर विजयी विरुद्ध पुणे (२-०), छत्रपती संभाजीनगर विजयी विरुद्ध बुलढाणा (२-०), जळगाव विजयी विरुद्ध बीड (२-०).