
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन सेंटर झोन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कन्नड येथील संत तुकाराम महाविद्यालय संघाने चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालय यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. या अटीतटीच्या अंतिम सामन्यात संत तुकाराम महाविद्यालयाच्या संघाने विजय मिळवला. विजयी संघामध्ये नागेश चामले, शरवण दुधाळे, लखन खवळे हे खेळाडू सहभागी होते. या संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ सुहास यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार किशोर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप निजामपूरकर, कोषाध्यक्ष त्र्यंबकराव करडेल, सरचिटणीस प्रसन्न पाटील, संचालक विश्वास मोतिंगे, संचालक सिद्धार्थ पाटील, प्राचार्य डॉ सुनीता शिंदे देशमुख व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.