
कन्नड ः छत्रपतीसंभाजीनगर येथे जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा वुशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच विभागीय शालेय वुशू स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी, तालुका कन्नड येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत रुद्राणी सोनवणे हिने रौप्यपदक तर आर्या पवार हिने कांस्यपदक पटकावून आपल्या गावाचे, शाळेचे तसेच संपूर्ण विभागाचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले. ग्रामीण भागातील मुलींनी कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेला हा यशाचा मानाचा तुरा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विकास पुरी, शिक्षक प्रवीणकुमार अहिरे, सुरज जाधव, शंकर वळवळे, विशाल अंबादे, कृष्णा चव्हाण तसेच राष्ट्रीय वुशू खेळाडू व राज्य वुशू पंच असलेले शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण थोरात यांचे क्रीडा मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सहाय्यक क्रीडा अधिकारी खंडू यादवराव, छत्रपती संभाजीनगर वुशू असोसिएशनचे सचिव महेश इंदापुरे, ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके, पांडुरंग अंबुरे,बंटी राठोड,चैतन्य पाळवदे,गटशिक्षणाधिकारी सबाहत, शिक्षण विस्तार अधिकारी डी टी शिंदे, केंद्र प्रमुख कौतिक सपकाळ व केंद्रीय मुख्याध्यापक विजय सोळुंके यांनी अभिनंदन केले.