
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख डॉ वंदना जाधव पाटील यांना प्रतिष्ठित आयईटीई-श्रीमती मनोरमा राठोड राष्ट्रीय मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार, सीएसआयओचे संचालक डॉ शंतनु भट्टाचार्य व आयईटीईचे अध्यक्ष डॉ सुनील श्रीवास्तव यांच्या हस्ते डॉ पाटील यांना प्रदान करण्यात आला.
डॉ वंदना पाटील या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) यांच्या फिजिक्स व कम्प्युटर सायन्स या विषयाच्या बोर्ड ऑफ स्टडीवर सदस्य आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा मिळून एकूण २५ संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी एचएससी बोर्ड पेपर सेटिंग समिती सदस्य म्हणूनही काम केले आहे. तसेच फिजिक्स विषयातील त्यांच्या ३ महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन झाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्य आणि आमदार प्रकाशदादा सोळुंके, सरचिटणीस आणि आमदार सतीशभाऊ चव्हाण, देवगिरी महाविद्यालय विकास समिती सदस्य हर्षअण्णा पंडित, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, कनिष्ठ विज्ञान विभागाचे उपप्राचार्य अरुण काटे, जेईई-नीट सेलचे संचालक एन जी गायकवाड तसेच सर्व उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.