
अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील १७ वर्ष वयोगटाच्या मुले व मुलींच्या संघांनी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत दुहेरी यश मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली. हे दोन्ही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
परीक्रमा क्रीडा संकुल काष्टी येथे ही स्पर्धा संपन्न झाली. यात १७ वर्ष वयोगटात मुलांच्या स्पर्धेत परीक्रमा पब्लिक, महादजी श्रीगोंदा, मढेवडगाव या संघांना पराभूत करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सांगवी फाटा संघाचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. या संघाकडून रुद्र लोखंडे, सार्थक वाळुंज, सार्थक ससाणे, अथर्व बोबडे, अभिजित बनकर, जुनेद पठाण, प्रथमेश कोकाटे यांनी उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले.
१७ वर्ष वयोगटात मुलींच्या स्पर्धेत देवदैठण संघाने परीक्रमा पब्लिक स्कूल व रेणूका देवी विद्यालय पिंपळगाव संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. साक्षी बनकर, नागेश्वरी वाघमारे, समीक्षा वाळुंज, दिव्या शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
१४ वर्ष वयोगटात मुलांच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कृष्णा बोबडे, सार्थक भोस, कृष्णा धांडे, साई वाघमारे, धीरज हानवते, जीवन शेळके यांनी उत्कृष्ट खेळ केला. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक संदीप घावटे, अमोल कातोरे, सतीश झांबरे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शाळा समितीचे अध्यक्ष चंदुलाल चोरडिया, मुख्याध्यापक विशाल डोके, पर्यवेक्षक नामदेव डुंबरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.