
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पॅरा अॅथलिट्सचे कौतुक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पॅरा अॅथलिट्सच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनी जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने केलेल्या कामगिरीला “ऐतिहासिक” असे संबोधले असून, हे यश देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असे म्हटले आहे.
भारताने या स्पर्धेत सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि सात कांस्यपदकांसह एकूण २२ पदके जिंकत आपला नवा विक्रम नोंदविला. हा विक्रम जपानच्या कोबे येथे २०२४ मध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमधील १७ पदकांच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा अधिक आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सर्व पदक विजेत्यांचा फोटो शेअर करत ‘X’ (ट्विटर) वर लिहिले,
“आपल्या पॅरा अॅथलिट्सची ऐतिहासिक कामगिरी! या वर्षीची जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप अत्यंत खास ठरली. भारतीय संघाने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत सहा सुवर्णांसह २२ पदके जिंकली आहेत. सर्व अॅथलिट्सचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचे यश अनेकांना प्रेरणा देईल. मला आपल्या संघातील प्रत्येक सदस्याचा अभिमान आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या स्पर्धेची यजमानी करणे हे भारतासाठीही सन्मानाची बाब आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे १०० देशांच्या खेळाडूंना आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना धन्यवाद.”
नीता अंबानी यांचेही अभिनंदन
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनीदेखील पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
भारताची यजमानी ऐतिहासिक ठरली
पहिल्यांदाच भारताने या प्रतिष्ठित जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले. या स्पर्धेत १०० हून अधिक देशांतील २,२०० पेक्षा जास्त खेळाडूंनी १८६ पदक प्रकारांमध्ये सहभाग घेतला. या यशस्वी आयोजनामुळे भारताने जागतिक क्रीडा नकाशावर आपले स्थान अधिक दृढ केले आहे.