
रायगड ः मुंबई विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत एस एन जी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट यश संपादन केले.
मुंबई विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा नुकतीच अंधेरी पश्चिम येथील शेठ एम ए स्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत एस एन जी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत एकूण १३ जिल्ह्यातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका या भागातील संघांनी सहभाग नोंदवला होता.
रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना एस एन जी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावत घवगवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेत तन्वी पानसरे (६८ किलो) हिने रौप्य पदक पटकावले. भाग्यश्री पाडीयाची हिने (५१-५५ किलो गट) कांस्य पदक पटकावले. तसेच, देव पवार (४५ -४८ किलो गट) याने या स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळ सादर केला.
या यशामध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक रोहित तानाजी सिनलकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. मुख्याध्यापिका डॉ देबोलीना रॉय, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.