रुतुराज गायकवाडचा टीम इंडियाला विसर? 

  • By admin
  • October 7, 2025
  • 0
  • 110 Views
Spread the love

तीनही फॉरमॅटमधून बाहेर, पण सीएसकेचा कर्णधार अजूनही ‘रन’च्या प्रतीक्षेत

मुंबई : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त असतानाच, बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी वनडे आणि टी-२० संघांची घोषणा केली आहे. मात्र या दोन्ही संघांमध्ये, तसेच कसोटी संघातही एक नाव पुन्हा एकदा अनुपस्थित राहिले ते म्हणजे रुतुराज गायकवाड!एकेकाळी तीनही फॉरमॅटसाठी योग्य मानला जाणारा हा पुण्याचा फलंदाज आता जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय संघरचनेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने जणू त्याला विसरल्यासारखे झाले आहे.

सुरुवात झळकदार, पण सातत्याचा अभाव

रुतुराज गायकवाडने आपला वनडे पदार्पण सामना ऑक्टोबर २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. परंतु डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या सामन्यानंतर त्याला वनडे संघातून वगळण्यात आले. आजवर खेळलेल्या ६ वनडे सामन्यांतून त्याने ११५ धावा केल्या आहेत. या काळात एक अर्धशतक झळकावले असले तरी शतकाचा अभाव आणि १९.१६ चा सरासरी धावसंख्या हा त्याच्यासाठी चिंतेचा विषय ठरला.

टी २० मध्ये झळकली कामगिरी, तरी बाहेर

टी २० फॉरमॅटमध्ये रुतुराजने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. २३ सामन्यांतून त्याने ६३३ धावा केल्या आहेत, त्यात एक शतक आणि चार अर्धशतके समाविष्ट आहेत. ३९.५६ च्या सरासरीने आणि १४३.५३ च्या स्ट्राईक रेटने तो खेळला, तरीही जुलै २०२४ नंतर तो टी २० संघातूनही बाहेर आहे. त्याच्या आकड्यांवर नजर टाकली तर तो सातत्यपूर्ण फलंदाज म्हणून योग्य ठरतो; मात्र निवडकर्त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आहे.

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार – पण दुखापतीने खंड

रुतुराज सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाचा कर्णधार आहे. मागील मोसमात त्याने संघाचे नेतृत्व करताना आत्मविश्वास दाखवला होता. पण  दुखापतीमुळे मध्यातच स्पर्धा सोडावी लागली. त्यानंतर संघाची धुरा पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे गेली, मात्र संघाचा अपेक्षित खेळ दिसून आला नाही.

पुनरागमन शक्य का?

आता प्रश्न असा आहे की, रुतुराज गायकवाडला पुन्हा टीम इंडियाच्या रंगात पाहायला मिळेल का? त्याची फलंदाजी तंत्रशुद्ध, शांत आणि सातत्यपूर्ण आहे. योग्य संधी मिळाल्यास तो पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो, असा क्रिकेट जाणकारांचा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *