
उद्योजक सुमित सराफ यांची टीम कबड्डीचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज
अलीगढ : उत्तर प्रदेश कबड्डी लीगने आपल्या दुसऱ्या हंगामासाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. कानपूर वॉरियर्सच्या यशस्वी पदार्पणानंतर आता अलीगढ टायगर्स या नव्या संघाच्या समावेशाने लीग अधिक विस्तारली आहे. शेखर सराफ मेमोरियल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक सुमित सराफ यांच्या मालकीचा हा संघ अलीगढच्या कबड्डी संस्कृतीला व्यावसायिक स्तरावर नवे पंख देणार आहे.
एसजे अपलिफ्ट कबड्डीच्या संकल्पनेतून जन्मलेली यूपीकेएल लीग आज केवळ राज्यस्तरीय उपक्रम न राहता, राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधणारे व्यासपीठ बनली आहे. अलीगढ टायगर्सच्या समावेशामुळे उत्तर प्रदेशातील कबड्डीला अधिक खोलवर आणि व्यापक पातळीवर नेण्याच्या लीगच्या ध्येयाला नवचैतन्य मिळाले आहे.
अलीगढ हे परंपरागत क्रीडा संस्कृतीसाठी प्रसिद्ध शहर असून, तेथील तडफदार व शिस्तप्रिय खेळाडूंच्या नवीन पिढीसाठी हा संघ प्रेरणास्थान ठरणार आहे. स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देत, या नव्या संघाच्या माध्यमातून तळागाळातील खेळाडूंना व्यावसायिक कबड्डीच्या जगात प्रवेश मिळविण्याचे नवे दालन खुले होणार आहे.
यूपीकेएलचे संस्थापक व संचालक संभव जैन म्हणाले, “पहिल्या हंगामात यूपीकेएलला मिळालेल्या प्रचंड यशाने सिद्ध केले की कबड्डी आता मुख्य प्रवाहातील क्रीडा प्रकारांशी खांद्याला खांदा लावून उभा आहे. कानपूरनंतर अलीगढचा समावेश म्हणजे प्रतिभावान खेळाडूंसाठी आणखी एक मजबूत व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही अशी परिसंस्था तयार करीत आहोत जिथे पुढील पिढी कबड्डीला आपला पहिला पसंतीचा खेळ मानेल.”
नव्या फ्रँचायझीचे मालक सुमित सराफ म्हणाले, “यूपीकेएलने कबड्डीला दिलेली व्यावसायिक ओळख ही या खेळासाठी क्रांतिकारक आहे. अलीगढमध्ये अफाट क्षमता आहे, आणि अलीगढ टायगर्सद्वारे आम्ही शहराची ताकद, शिस्त आणि अभिमान या सर्वांचा संगम मैदानावर उतरवू. आमचा उद्देश फक्त क्रीडा विजयापुरता मर्यादित नाही – आम्ही आरोग्य, तंदुरुस्ती आणि संधी या तीनही क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम घडवू इच्छितो.”
पहिल्या सत्रातील यूपीकेएलची कामगिरीही दैदिप्यमान ठरली होती. बीएआरसी इंडियाच्या आकडेवारीनुसार लीगने ३० दशलक्षाहून अधिक टीव्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोच साधली तर ३०० कोटीहून अधिक डिजिटल इंप्रेशन नोंदवले. ₹२३८ कोटींच्या मूल्यासह यूपीकेएलने भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्रीडा संपत्तींपैकी एक म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.अलीगढ टायगर्सचा समावेश यूपीकेएलच्या प्रवासात नवी ऊर्जा आणि स्पर्धात्मक धार घेऊन येईल. चाहत्यांची उत्सुकता, खेळाडूंची जिद्द आणि शहराचा अभिमान – हे सर्व घटक एकत्र येऊन अलीगढमध्ये कबड्डीच्या नव्या युगाचा आरंभ करणार आहेत.