
मुस्लीम क्रिकेट चॅम्पियनशिप ः साबीर हुसेन, मोहम्मद हमजा सामनावीर
नागपूर ः मुस्लीम क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेला बुधवारी नागपूर शहरात शानदार सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात साबा वॉरियर्स संघाने नागपूर टायटन्स संघावर ५४ धावांनी विजय नोंदवला. दुसऱया सामन्यात रॉकेट इंटरनॅशनल स्पार्टन्स संघाने ताडोबा टायगर्स संघाला २० धावांनी पराभूत केले. या सामन्यांमध्ये साबीर हुसेन व मोहम्मद हमजा यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

गुरुनानक फार्मसी कॉलेज मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात साबा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात पाच बाद १६५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना नागपूर टायटन्स संघ २० षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला. साबा वॉरियर्स संघाने ५४ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात मोहम्मद हमजा याने ३८ चेंडूंत ५० धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने तीन टोलेजंग षटकार व एक चौकार मारला. फैजान उर रहमान याने ३२ चेंडूत ३५ धावा फटकावल्या. त्याने तीन उत्तुंग षटकार ठोकले. मोहम्मद इमरोज खान याने ३० चेंडूत दोन षटकार व दोन चौकारांसह ३३ धावांची आक्रमक खेळी केली.

गोलंदाजीत अयान हुसेन याने ११ धावांत दोन गडी बाद केले. इम्रान खान याने २० धावांत दोन बळी टिपले. मोहम्मद सिराज याने ७ धावांत एक बळी घेतला.
ताडोबा टायगर्स पराभूत
दुसरा सामना रॉकेट इंटरनॅशनल स्पार्टन्स संघाने ताडोबा टायगर्स संघावर २० धावांनी विजय साकारला. रॉकेट स्पार्टन्स संघाने २० षटकात सहा बाद १८१ अशी भक्कम धावसंख्या उभारली. ताडोबा टायगर्स संघ २० षटकात सात बद १६१ धावा काढू शकला.

या सामन्यात साबीर हुसेन याने आक्रमक शतक ठोकले. त्याने ६४ चेंडूंत पाच चौकार व नऊ टोलेजंग षटकार ठोकत १०० धावा काढल्या. तौसिफ अहमद याने ५४ चेंडूत ७३ धावा फटकावल्या. त्याने पाच उत्तुंग षटकार व एक चौकार मारला. अमन खान याने पाच चौकार व दोन षटकारांसह ५० धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत मोहम्मद अन्स याने ३६ धावांत तीन गडी बाद केले. अरमान हुसेन याने २५ धावांत दोन तर अब्दुल याने ३६ धावांत दोन बळी घेतले.