
कर्णधार अनुजा पाटीलचे आक्रमक नाबाद अर्धशतक
नागपूर ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सिनियर महिला टी २० ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने तामिळनाडू महिला संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवत विजयी सलामी दिली.
या सामन्यात तामिळनाडू महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात चार बाद ११२ धावा काढल्या. त्यात कमलिनी हिने सर्वाधिक ३२ धावा काढल्या. अर्शा चौधरी हिने नाबाद २९ धावांचे योगदान दिले. अनुषाने १७ धावा काढल्या.
महाराष्ट्र महिला संघाकडून पठारे (१-२९), अनुजा पाटील (१-२१), इशिता खळे (१-९) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
महाराष्ट्र महिला संघाच्या तेजल हसबनिस व खुशी मुल्ला या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात करत संघाचा विजय निश्चित केला. खुशी मुल्लाने चार चौकारांसह २१ धावा काढल्या. संघाची उपकर्णधार मुक्ता मगरे (०) स्वस्तात बाद झाली. कर्णधार अनुजा पाटील व तेजल हसबनिस या जोडीने दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. हसबनिस हिने ४९ चेंडूंत नाबाद ३४ धावा काढल्या. तिने दोन चौकार मारले. अनुजा पाटील हिने ४० चेंडूत नाबाद ५७ धावा काढल्या. तिने सात चौकार व एक षटकार मारला. अक्षरा श्रीनिवासन हिने १४ धावांत दोन गडी बाद केले.